पाच विद्यार्थ्याची शानदार कामगिरी: डिझाईन स्किल्स अकॅडमीतर्फे विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान


Design-Skills-Academy-honors-the-winning-students

कलेला तंत्रज्ञानाची जोड आवश्यक : डॉ. गीता मोहन

पुणे: कलाकार हा नेहमी नाविन्याचा ध्यास घेणारा असतो. ज्ञान व कौशल्य यांच्या जोरावर तो आपली ओळख तयार करत असतो. कला जोपासताना तंत्रज्ञानाची साहयता घेऊन ती आणखी विकसित करणे हीच काळाची खरी गरज आहे. तंत्रज्ञान आणि कला यांची योग्य सांगड घातल्यास तुम्ही नक्कीच या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकता, असा कानमंत्र डॉ. गीता मोहन यांनी विद्यार्थ्याना दिला. 


यावेळी डॉ. गीता मोहन, डिझाईन स्किल्स अकॅडमीच्या अध्यक्षा श्रीदेवी सतीश, समीर प्रभूने आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेत डिझाईन स्किल्स अकॅडमीच्या  विद्यार्थ्यांनी २ सुवर्ण, १ रौप्य तर २ कांस्य पदके पटकावली. या विद्यार्थ्याचा सत्काराचे आयोजन डिझाईन स्किल्स अकॅडमीच्या वतीने करण्यात आले होते. राज्य स्पर्धेत ग्राफिक डिझाईन स्किल्स गटात नूपुर शहाने सुवर्ण तर प्रेक्षा लुंकडने कांस्य पदक पटकावले. गेम डिझाईन स्किल्स प्रकारात पंकज सिंगने सुवर्ण, सिद्धार्थ सतीशने रौप्य तर यजुर पटेल याने कांस्य पदक पटकविताना राज्य स्पर्धेत आपला ठसा उमटविला.     


शांघाय, चीन येथे सप्टेंबर २०२२ रोजी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचा समारोप सोहळा आयएसएमई मॅनॅजमेन्ट स्कूल, मुंबई येथे पार पडला. यावेळी अकॅडमीच्या विजेत्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. 


या स्पर्धेत राज्यातील २६३ युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. त्यातील १३२ युवक-युवतींनी पदके पटकावली. आता गांधीनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत आणि त्यानंतर बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी या युवक-युवतींना मिळणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 


डिझाईन स्किल्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. यात श्वेता रतनपुरा यांनी २०१९ रोजी रशियाच्या काझान येथे आयोजित केलेल्या जागतिक कौशल्य ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. या प्रकारात कांस्यपदक मिळविणारी श्वेता पहिली भारतीय महिला ठरली. श्वेताला सतीश नारायणन यांचे प्रशिक्षण लाभले.  त्यानंतर अकॅडमीने ग्राफिक्स, गेम डिझाईन, फिल्ममेकिंग सारख्या विविध प्रकारात आधुनिक शिक्षण प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. कनिष्ठ कौशल्य श्रेणीमध्ये १७ वर्षांखालील वयोगटात अकॅडमीची विद्यार्थिनी किमया घोमन राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाली असून १८ -१९ सप्टेंबरला होणाऱ्या सुवर्णपदक स्पर्धेत ती सहभागी होणार आहे. 


डिझाईन स्किल्स अकॅडमीचे तज्ञ सतीश नारायणन म्हणाले, आमचे विद्यार्थी सातत्याने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत पारितोषिके मिळवत आहेत. ग्राफिक डिझाईन आणि गेम डिझाईन प्रकारात राज्य कौशल्य स्पर्धेत चमकदार कामगिरीमुळे पालक देखील आनंदी आहेत. अशा प्रकारचे देखील करियरचे मार्ग आहेत याबाबतीत आपल्याकडे पुरेशी माहिती नसल्याने अशा क्षेत्रात युवा मोठ्या संख्येने उपलब्ध नाहीत. युवकांना या क्षेत्रात देखील करियरच्या मोठ्या संधी आहेत, यासाठी जागरूकता निर्माण करण्याचे काम डिझाईन स्किल्स अकॅडमीच्या वतीने करण्यात येत आहे. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.