पुणे: पोलिसाची नोकरी म्हटली की त्याला वेळेचं बंधन नाही. अनेकदा बंदोबस्त, सण-उत्सव यांच्यावेळेस पोलिसांना घड्याळाकडे न पाहाता आपलं कर्तव्य बजावावं लागतं. ज्यादा तास काम करण्याचा पोलिसांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर आणि कौंटुबिक स्वास्थ्यावरही परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्युटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी इतर पोलिस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी ८ तासांची ड्युटी जाहीर केली आहे.
पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सण, उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे या निमित्ताने वर्षभरातून अनेकवेळा ज्यादा तास कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर त्याचा परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. यासोबतच त्यांच्या कर्तव्यावर आणि आरोग्यावरही याता परिणाम होत असल्याचे निदर्शनात आले.
ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयाचा पुणे ग्रामीण दलात कर्तव्य बजावणाऱ्या सुमारे साडेतीनशे महिला पोलिसांना लाभ होणार आहे. या निर्णयाचं सर्व महिला पोलिसांनी स्वागत केलं आहे.