पुणे: अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आजपासून नाट्यगृह सुरु झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. सकाळी 8 वाजता अजित पवार यांचं बालगंधर्व रंगमंदिरात आगमन झालं. अजित पवारांचा नाट्य परिषद आणि कलाकारांच्या वतीनं सन्मान करण्यात आला. शिंदेशाही पगडी घालून आणि तलवार देऊन अजितदादांचा सन्मान करण्यात आला. मंचावर विविध पक्षाचे राजकीय नेते, नाट्य परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर केलेल्या भाषणात अजित पवार म्हणाले, “उपस्थित सर्व कलाकार बंधु भगिनींनो, आज वेगळ्या कार्यक्रमासाठी एकत्रित जमलोय. निसर्गापुढे काही चालत नाही, 19 महिने हे सगळं बंद होतं, कलाकार सारखे भेटायचे, नाट्यगृह कधी सुरु होणार म्हणून प्रश्न विचारायचे, पण आज अखेर आपण नाट्यगृह सुरु करण्याला परवानगी दिलेली आहे. आम्हाला देवळातली घंटा वाजवायची सवय आहे मात्र मी पहिल्यांदा नाट्यगृहातील घंटा वाजवली”
बालगंधर्व पुनर्विकासावर बोलताना अजित पवार म्हणाले, बालगंधर्वचा विकास करायला दोन मतप्रवाह आहेत. त्याचाही विचार करावा लागेल. कलाकारांचाही विचार बांधकाम करताना घ्यावा लागेल, मी महापौरांना सूचना देईन आणि आयुक्तांना सूचना देईन. आधीच 17 महिने बंद होतं. याचा प्लॅन बघावा लागेल आणि सुरक्षिततेचा विचार करावा लागेल.