नांदेड: सांगली महापालिकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा शॉक द्या, तुम्हाला सोन्याचा मुकुट घालेन, अशी ऑफर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना ऑफर दिली आहे. देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला आघाडी द्या, मी तु्हाला गाव जेवण देईन, अशी खुली ऑफरच चंद्रकांत पाटील यांनी देगलूरच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.
देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी काल रात्री ही अनोखी ऑफर दिलीय. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचे पाटील यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे या गाव जेवणात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केलं. पाटील यांच्या गाव जेवणाच्या ऑफरमुळे ते चांगलेच चर्चेत येण्याची शक्यता आहे. तसेच सध्या देगलूर-बिलोली विधानसभेत पाटील यांच्या ऑफरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
देगलूर विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी काँग्रेस पाठोपाठ भाजपने कंबर कसलीय. भाजपने या निवडणुकीत आतापर्यंत रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, भागवत कराड आणि आशिष शेलार या प्रमुख नेत्यांना प्रचारात उतरवलंय. भागवत कराड यांनी देगलूर पोट निवडणुकीसाठी गावोगावी प्रचार सभा घेतल्या आहेत. खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. काँग्रेस आणि भाजपच्या प्रचारसभामुळे देगलूरमध्ये आता रंगत येत आहे.