खडकवासला: बदलत चाललेल्या शिक्षण पद्धतीत आधुनिकतेची कास धरून उद्याच्या पिढीला अधिकाधिक परिपक्व बनविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शासनाच्या वतीने हाती घेण्यात येत असतात. सर्व शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण शैक्षणिक विकास साधणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरु आहेत. कोरोना काळात शाळा बंद असल्याने डिजीटल तंत्रज्ञानाचे महत्व शिक्षण क्षेत्रात वाढू लागले. पुणे जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळांमध्ये स्मार्ट शाळा हा उपक्रम राबवण्यास प्रारंभ केलेला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पूजा पारगे यांनी केले.
याच अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुजा पारगे यांच्या माध्यमातून ई-लर्निंग किटचे अनावरण व उदघाटन समारंभ गोऱ्हे बु. येथे पार पडला. या वेळी पुजाताई पारगे यांच्यासह, ग्रामपंचायत सरपंच शारदा खिरीड, उपसरपंच नरेंद्र खिरीड, सरपंच सचिन पासलकर, उपसरपंच सुशांत खिरीड, ग्रामपंचायत सदस्य सुजित तिपोळे, संदीप खिरीड, सर्व सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पारगे म्हणाल्या, प्रत्येक तालुक्यातील शाळांमधील मुलांना कोरोना काळातही शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने स्मार्ट टीव्हीचे वाटप केले जात आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये त्यामध्ये सर्व शैक्षणिक ॲप्स भरलेले आहेत. त्या ॲप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्यावत असे शिक्षण मिळणार आहे.