बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या सीटी स्कॅन विभागाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी तळीरामांना फटकारलं. तसेच कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्याचं आवाहनही केलं. आजार टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारा. सकाळी लवकर उठा. कोणतंही व्यसन करू नका. व्यसनं करशाल तर बरबाद व्हाल, असं अजित पवार म्हणाले.
पवार म्हणाले, येथील आयसीयु युनिट, सीटी स्कॅन मशीनसह दवाखान्याची ओपीडी तातडीने सुरु व्हायला हवी. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची डेडलाईन द्यावी, हे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर गाठ माझ्याशी आहे, कोविडच्या दोन्ही लाटेत या रुग्णालयाची 500 खाटांची क्षमता असूनही त्याचा उपयोग झाला नाही याची खंत मला आहे. मेडीकल कॉलेज व दवाखाना किती तारखेला पूर्ण करणार याचे वेळापत्रकच देण्याची सूचना त्यांनी केली. सीटी स्कॅन लवकर सुरु झाले तर त्याचा लाभ बारामतीकरांना होईल.
बारामती वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत आयसीयू वॉर्ड लवकर सुरू करा. त्यामुळे रुग्णांची सोय होईल. सीटी स्कॅन युनिटही लवकर सुरू करा. गोरगरीबांचं जीवन सुखकर होण्यासाठी सुविधा लवकर द्या. सीएसआरमधून मिळणारी उपकरणंही वापरा. 500 बेडची क्षमता असतानाही वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय वापरता आले असते. त्यामुळे रुग्णालयाचे काम तातडीने मार्गी लावा, असं सांगतानाच मी वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल सुचना केल्या आहेत. त्याची नोंद संबंधित विभागाने घेतली असेल. आता मी त्यावर लक्ष ठेवेल. नाहीतर एखाद्या दिवशी पहाटे पाचलाच येवून बघतो काम सुरुय की नाही, असंही त्यांनी सांगितलं.