पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं आज छापेमारी सुरु केली आहे. त्यात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि तीन बहिणींचाही समावेश आहे. त्याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या मते आज जे काही घडलं ते उत्तर प्रदेशच्या प्रश्नावर माझ्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच’, अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपला जोरदार टोला लावला.
‘शेतकरी आपली भूमिका मांडण्यासाठी जात असताना सत्ताधारी पक्षातील घटकांची वाहनं त्यांच्या अंगावर जातात. त्यात काही शेतकरी चिरडून ठार होतात. हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं. सहाजिकच या घटनेचा सर्वांनी निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारनंही मंत्रिमंडळ बैठकीत निषेध व्यक्त केलाय. मीही याबाबत तीव्र भूमिका व्यक्त केलीय. लखीमपूरच्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधारी पक्षातील लोकांना आलाय. त्याची प्रतिक्रिया म्हणून आज हे सुरु असल्याची शक्यता आहे’, अशा शब्दात पवारांनी आयकर विभागाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून आयकर विभागाच्या रडारवर अजित पवार आहेत. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयावर छापेमारी झाली आहे. याआधी आयकर विभागाने अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरावरही छापा टाकला होता. यापैकी एक बहीण कोल्हापूर तर इतर दोन बहिणी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला आहे.