पुणे: मुंबई-पुणे मार्गावर धावणारी सिंहगड एक्सप्रेस गेल्या १९ महिन्यांपासून बंद होती. ही रेल्वेगाडी प्रशासनाने कोरोनामुळे बंद केली होती. ती आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. आज स्टेशन मास्तर यांनी गाडीच्या पाटीला हार घालून स्वागत केलं. आजपासून ही गाडी मुंबई व पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. पुणे व मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबईला ये-जा करण्यासाठी ही गाडी महत्वाची आहे.
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेक मार्गावरील रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. परंतु पुणे-मुंबई मार्गावर धावणारी सिंहगड एक्सप्रेस सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही रेल्वे सुरु करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर आज पासून पुणे-मुंबई मार्गावर सिंहगड एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे
या गाडीचे बुकिंग दसऱ्याच्या मुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू झाले आहे. कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानादरम्यान कोविडशी संबंधित सर्व निकष, मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) चे पालन करण्याचे आवाहन पुणे रेल्वे विभागाचे प्रवक्ते मनोज झावर यांनी केले आहे.