'अलिप्त' मध्ये मुख्य भूमिकेत तन्वी हेगडे, २९ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार अलिप्त

'अलिप्त' मध्ये मुख्य भूमिकेत तन्वी हेगडे, २९ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार अलिप्त


काही कलाकार फार कमी चित्रपटांमध्ये झळकतात, पण अनोख्या अभिनयशैलीमुळं प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. त्यामुळंच असे कलाकार जेव्हा एखादा चित्रपट साईन करतात, तेव्हा त्याबद्दल आपोआपच उत्सुकता वाढते. अशा कलाकारांपैकीच एक आहे तन्वी हेगडे... आजवरच्या कारकिर्दीत तन्वीनं फार चित्रपट केले नाहीत. मोजक्या मालिका आणि चित्रपटांमध्ये तन्वीनं साकारलेल्या व्यक्तिरेखा रसिकांच्या हृदयात घर करणाऱ्या ठरल्या आहेत. 'अलिप्त' या आगामी मराठी चित्रपटाद्वारे तन्वीनं पुन्हा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. २९ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


निर्माते अनिकेत विनायक कारंजकर यांनी 'कटिंग चाय प्रॉडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत 'अलिप्त' या चित्रपटाची निर्मिती केली असून 'संजू एंटरटेनमेंट'चे संजय लक्ष्मणराव यादव हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शक मनोज सुधाकर येरुणकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. स्वप्नील प्रकाश जाधव यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखन केलं असून, तन्वीसोबत मुख्य भूमिकाही साकारली आहे. 'जान की कसम' आणि 'गज गामिनी' या चित्रपटांमध्ये तन्वी बालकलाकाराच्या रूपात झळकली. त्यानंतर 'राहुल', 'पिता', 'विरुद्ध', 'वाह! लाईफ हो तो ऐसी', 'चल चले', 'धुरंधर भाटवडेकर', 'अथांग', 'शिवा' या चित्रपटांसोबतच 'शाका लाका बूम बूम' आणि 'सोन परी' या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. 'अलिप्त बाबत तन्वी म्हणाली की, ज्या चित्रपटांमधील कॅरेक्टर्स माझ्या मनाला भिडतात तेच मी स्वीकारते. दिग्दर्शक मनोज येरुणकर यांनी जेव्हा 'अलिप्त'चं कथानक ऐकवलं, तेव्हा त्यात नावीन्याच्या विविध छटा जाणवल्या. माझ्या व्यक्तिरेखेतील नाना पैलूंची जाणीव झाली. त्यामुळं 'अलिप्त'ला नकार देण्याचं कारणच नव्हतं. कॅरेक्टर आणि कथानकाबाबत जास्त काही रिव्हील करता येणार नाही. या चित्रपटात काम करताना एका प्रोफेशनल युनिटसोबत मनासारखं काम करायला मिळाल्याचं समाधान लाभलं. या चित्रपटाच्या शीर्षकासोबत देण्यात आलेली 'भूतकाळातील खुणा वर्तमानात अलिप्त होत नाहीत, तर त्या पुन्हा जन्म घेतात...' ही टॅगलाईन खूप महत्त्वाची असून, कथानकाचा गाभा सांगणारी आहे. स्वप्नीलसह इतर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभवही आनंददायी होता असं तन्वी म्हणाली.


स्वप्नील आणि तन्वीसोबत या चित्रपटात शरयू सोनावणे, भूषण घाडी, सुनील देव, सुशांत शेलार आदी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. डीओपी अनिकेत कारंजकर यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. स्वप्नील आणि जन्मेजय पाटील यांनी गीतलेखन केलं आहे, तर संगीतकार राजेश सावंत यांनी गीतांना स्वरसाज चढवला आहे. दिलीप मेस्त्री यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून, कला दिग्दर्शन महेंद्र शिव मंगल अप्पा राऊत यांनी केलं आहे. संकलन हर्षद वैती यांनी केलं असून, अप्पा तारकर यांनी ध्वनी आरेखनाचं काम पाहिलं आहे. अभय मोहिते यांनी कलाकारांना रंगभूषा, तर प्रतिभा गुरव यांनी वेशभूषा केली आहे. पार्श्वसंगीत, फॉली आणि ध्वनी मिश्रण ही ट्रिपल रिस्पॅान्सिबिलीटी लोकेन यांनी सांभाळली आहे. एस. नंदागवले यांनी कार्यकारी निर्माते या नात्यानं काम पाहिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.