पुणे: दोन प्रभाग पद्धतीची मागणी मी कधीच केली नव्हती. आता आम्ही तीन प्रभाग फायनल केले आहेत आणि हा निर्णय कायम राहणार आहे, असं सांगतानाच तीन प्रभागांचा फायदा नक्की कुणाला होतो ते पाहू, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेवरून सरकारमधील तीन पक्षात वाद दिसला होता. अखेर तीन सदस्यीय प्रभाग रचना येणाऱ्या निवडणुकांत असणार आहे. आज पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी प्रभाग रचनेबद्दल वक्तव्य केले आहे.
अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. तीनचा प्रभाग हे फायनल आहे. मी कधीच दोनचा प्रभाग मागितला नाही. तीन प्रभागांचा नेमका कोणाला फायदा होतो ते पाहू, असं अजितदादा म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायची की नाही याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहूनच घेतला जावा असं माझं मत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.