तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात २४ तारखेला आंदोलन

 

पुणे: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात मोर्चेबांधणी करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता थेट पुण्यातच आंदोलन करणार आहेत. तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात २४ ऑक्टोबर रोजी पुण्यात मोठं आंदोलन होणार असून त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.


मनसेचे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी या आंदोलनाची माहिती दिली. तळजाई टेकडीवर प्रकल्प होत असून या टेकडीवर एक प्रकारचं अतिक्रमणच केलं जाणार आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या २४ तारखेला हे आंदोलन होणार आहे. सकाळी ७ वाजताच या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.


सहकारनगर भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे १०७ एकर जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) पुणे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केला आहे. तळजाई जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील मूळ जैवविविधता नष्ट होण्याची भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा प्रकल्पच रद्द करण्यासाठी नागरिकांनी ‘तळजाई बचाव अभियान’ सुरू केले आहे. त्याची दखल मनसेनेही घेतली असून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.