नाशिक: कोरोना लसीकरणाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात 70 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 35 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोसही देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच टोपे म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सध्यातरी शक्यता नाही. त्यामुळे टेंन्शन घेवू नका. राज्यात एकूण साडे नऊ कोटी डोस देण्यात आल्याचं टोपेंनी सांगितलं. नाशिकमधील एका कार्यक्रमात टोपे बोलत होते.
ते म्हणाले, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सोयाबीनच्या काढणीचं काम होतं. त्यामुळे मिशन कवचकुंडल अभियानाची गती मंदावली होती. त्यामुळे आता मिशन कवचकुंडल अभियान आता दिवाळीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. ज्या लोकांनी अद्याप कोरोना लस घेतली नाही, त्यांना विनंती आहे की या अभियानाला त्यांनी चांगला आणि सकारात्मक प्रतिसाद द्यावा.
ते पुढे म्हणाले, कोरोना संदर्भात टास्क फोर्स बैठकीत विविध शक्यता तसेच उपाययोजनांविषयी चर्चा झाली आहे. लहान मुलाच्या लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कॅडीला आणि कोव्हॅक्सीन लसीचा वापर करणार आहोत. दोन ते अठरा वयोगटासाठी हा निर्णय असेल. घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा प्रयत्न असेल. महाविद्यालयीन तरुणांचं लसीकरण हे मोठं आव्हान आहे. राज्यात पहिला डोस ७० टक्के तर दुसरा डोस ३५ टक्के नागरिकांना देण्यात आला आहे. राज्यात जवळपास ९ कोटी लसीकरण झाले आहे. यासंदर्भात मिशन कवचकुंडलला दिवाळी पर्यंत मुदतवाढ देण्याचा विचार आहे. देशातील लसीकरण नियोजनात महाराष्ट्राचा मोठा हातभार आहे.