पुणे: उत्तरप्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या अंगावरून वाहने घालण्यात आली. यामध्ये चार शेतकरी तसेच अन्य चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशात उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनीदेखील या घटनेच्या निषेध म्हणून सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या घटनेच्या निषेधार्थ मार्केटयार्डमधील सर्व संघटनाची संयुक्तरीत्या बैठकीमध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे
महाराष्ट्र बंदच्या अनुषंगाने मार्केट यार्डमधील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, आडते असोसिएशन, तोलणार संघटना, महात्मा फुले कामगार युनियन, टेम्पो पंचायत, महाराष्ट्र टेम्पो संघटना, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, भारतीय कामगार सेना, हमाल पंचायत इत्यादी सर्व संघटनेच्या वतीने सकाळी १० वाजता अण्णासाहेब मगर पुतळा, फळे-भाजीपाला विभाग गेट नंबर-१ या ठिकाणी लखीमपूरमध्ये चिरडून मृत पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे, असे अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक संतोष नांगरे यांनी सांगितले.
लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघीचे घटकपक्ष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (9 ऑक्टोबर) तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेत बंदला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच हा बंद सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा. सोमवारी व्यापाऱ्यांनी आस्थापना बंद ठेवाव्यात असे आवाहन केले आहे