बारामती: राज्याचे उपमुख्यंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना लोक आदराने दादा म्हणतात. अजित पवार राज्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी असतात. त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची बातमी होते. विशेष म्हणजे सामान्य जनतेच्या मनातदेखील अजित पवार यांचं स्थान अढळ आहे. याची प्रचिती बरामती येथे आली. बारामती येथे दौऱ्यावर असताना अजित पवार यांचे महिलांनी “अजित दादा तुमचं काम एक नंबर” असे म्हणत तोंडभरून कौतूक केले. विशेष म्हणजे या कौतुकानंतर पवार चांगलेच भावुक झाले. महिलेचे आभार मानताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
अजित पवार नेहमीच लोकांच्या संपर्कात असतात. जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष लोकांना भेटण्याकडे त्यांचा कल असतो. आज पवार बारामतीमध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. पवार यांची बहीण, मुलगा तसेच निकटवर्तीय यांची कार्यलये, कंपन्यांवर आयकर विभागाने छापे टकले. या छापासत्रानंतर पवार यांचा बारामतीचा हा पहिलाच दौरा होता. याच कारणामुळे हा दौरा विशेष मानला जात होता. वृक्षारोपण करताना अजित पवार यांच्या आजूबाजूला बऱ्याच महिला उपस्थित होत्या. या महिलांनी अजित पवार यांचे तोंडभरून कौतूक केले. “अजितदादा तुमचे काम एक नंबर आहे. तुम्ही खूप छान काम करता. तुम्ही खूप मोठे व्हा. यशस्वी व्हा. आमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत,” अशा शब्दांत महिलांनी अजित पवार यांचे कौतुक केले.
विशेष म्हणजे महिलांनी स्तुती करताच अजित पवार भावुक झाले. त्यांनी महिलांसमोर थेट हात जोडले. तसेच “तुम्ही निवडून देता म्हणून मी काम करतो,” असे म्हणत अजित पवार यांनी महिलांचे नम्रपणे आभार मानले.