मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारांशी संबंध असून त्यांच्याच आशीर्वादाने राज्यात बनावट नोटांचा खेळ सुरू होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेचचं ट्विट केलं आहे. डुकराशी कुस्ती कधीच खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे, असा घणाघाती हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून नवाब मलिकांच्या आरोपाला तात्काळ उत्तर दिलं आहे. यासाठी फडणवीस यांनी एका सुविचाराचा आधार घेतला आहे. कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे. त्यामुळे तुम्हीही घाणीने माखून जाता आणइ डुकरालाही तेच आवडत असतं, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे.
कोणतेही आरोप झाल्यानंतर फडणवीस मीडियासमोर येऊन प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. दिवाळीपूर्वी मलिक यांनी ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात अटक झालेल्या जयदीप राणाचे फडणवीसांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी काही तासात मीडियासमोर येऊन मलिक यांना प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, आज मलिक यांनी आरोपांची माळ लावल्यानंतर फडणवीसांनी केवळ ट्विट करून त्यांना उत्तर दिलं. तेही एका सुविचाराचा आधार घेत फडणवीसांनी उत्तर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारांना कसे आशीर्वाद होते आणि राज्यात बनावट नोटांचा खेळ कसा सुरू होता याचा गौप्यस्फोट केला. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी झाली. तेव्हा नोटांबंदीमुळे दहशतवाद खतम होईल. काळापैसा बंद होईल. बनावट नोटा संपवण्यासाठी नोटाबंदी करण्यात येत आहे. नोटाबंदी नंतर संपूर्ण देशात 2000 आणि 500 च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. तामिळनाडू, पंजाबमध्ये बनावट नोटांवर कारवाई झाली. पण 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाराष्ट्रात एकदाही बनावट नोटा पकडल्या गेल्या नाहीत. कारण फडणवीसांच्या संरक्षणात राज्यात बनावट नोटांचा धंदा सुरू होता. 8 ऑक्टोबर 2017 रोजी 14 कोटी 56 लाखांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटांचं नेक्सस दाऊद, बागंलादेश आणि पाकिस्तान पर्यंत आहे, असा दावा मलिक यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.