खडकवासला: 'लाडू म्हणजे गोल असतो,तो गोड असतो' एव्हढच माहिती असणारा आदिवासी कातकरी समाजवर्ग म्हणजे डोंगरी भागात वास्तव्य करणारा समुदाय.अशाच दुर्लक्षित व वंचित असलेला समाज दिवाळी सण कसा साजरा करीत असेल? हा कुतूहुलापोटी 18 वर्षापूर्वी पडलेला प्रश्न आणि त्यातूनच एक महान कार्यास प्रारंभ झाला. हे महान कार्य म्हणजे एक सामाजिक बांधिलकी - आदिवासी कातकरी बांधवाना त्यांच्या पालावर व वस्त्यांवर जाऊन दिवाळी फराळ व इतर वस्तूंचे वाटप करणे. हे सेवेचे महापर्व सुरू झाले ते 2005 सालापासून ते आजही अखंडित व अविरतपणे चालू आहे.
खडकवासला ते पानशेत या निसर्गरम्य अशा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कादवे, कुरण खुर्द, पानशेत, सोनापूर, ओसाडे, निगडे-मोसे, वरदाडे-थोपटेवाडी या भागातील आदिवासी कातकरी बांधवासोबत दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी न विसरता, न चुकता त्याना लाडू, शंकरपाळी, चकली, चिवडा, करंजी, सोनपापडी आदि दिवाळी फराळ व मिठाई बरोबर वस्त्र, खेळणी आणि बिस्किट्स व चॉकलेट्स यांचे वाटप केले जाते.यावर्षी देखील हा महायज्ञ अतिशय आनंदाने दिवाळी पाडव्याच्या दिवशी पार पडला.
सदरच्या सेवकार्याचे आयोजन 'मित्रपरिवार व लायन्स क्लब ऑफ पुणे विसडम' यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते यामध्ये जवळजवळ शंभरहून अधिक कातकरी कुटुंबे आणि पाचशेहून अधिक आबालवृद्ध व लहान मुले यांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी या वंचित बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून एक विलक्षण स्वर्गीय सुखाची अनुभूती प्राप्त होते. हा आनंद गेले 17 वर्षे आम्ही अनुभवतोय आणि आमचा दिवाळी पाडवा अगदी दिवसभर आम्ही दरवर्षी या बांधवांच्या बरोबर साजरा करतो, अशी बोलकी प्रतिक्रिया सहभागी सर्वच मित्रपरिवराची असते. या सेवकार्यामध्ये यावर्षी महेश गायकवाड, अजय वीरकर, सदाशिव जिंदे, योगेश शिंगाडे, प्रशांत उरणकर, उमेश दांगट, मधुकर कोटा, प्रशांत इंगवले, कल्याण कराळे, अनिल धुमाळ, राजेंद्र शिंदे,तुकाराम गायकवाड, श्री सावंत यांच्यासह आर्य दांगट, साक्षी गायकवाड, अथर्व इंगवले,तन्मय गायकवाड, तनिष्क गायकवाड ही लहान मुले सहभागी झाली होती.