पिंपळे गुरव: पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचे जन- संपर्क कार्यालय आहे. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात इसमांनी कार्यालयाच्या दिशेने दोन रॉकेल बॉम्ब फेकले. त्यामुळे आग लागली होती. मात्र, उपस्थितांनी प्रसंगावधान राखून आग विझवली. त्यामुळे मोठी हानी टळली.
आरोपींच्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर काळे लावले होते. या प्रकारात कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. तसेच शहरात काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलिसांची पाच पथके सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम करीत आहेत. घटनास्थळाची पाहणी करून फिर्याद नोंदविण्यात येईल असे पोलीसांनी सांगितले.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. यातील एका फुटेजमध्ये आरोपी स्पष्टपणे कैद झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह शहरातील उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
काय आहे ‘रॉकेल बॉम्ब’
पिंपरी चिंचवडमध्ये रॉकेल बॉम्ब : काचेच्या बाटलीमध्ये रॉकेल भरून त्याची वात पेटवली जाते. त्यानंतर बाटली फेकल्यानंतर बाटली फुटून रॉकेल सांडते व मोठा भडका होतो. रॉकेल बॉम्बमुळे मोठी आग लागण्याची शक्यता असते. आंदोलनकर्त्यांनी यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी रॉकेल बॉम्बचा वापर केल्याचे समोर आले आहे.