खडकवासला- सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेट ते किरकटवाडी फाटा या बहुचर्चित रस्त्याचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम सुरू असल्याने कंत्राटदाराचा ढिसाळपणा व शासन यंत्रणेच्या बेपर्वाईचा सर्वांना प्रत्यय यरत असून नांदेड फाट्याजवळ वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहेच मात्र रस्त्याला तलावाचे स्वरूप अनुभवास आले आहे.
मागील काही दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते म्हणून जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी तातडीने आदेश काढून एक महिन्यासाठी वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला व तो अंमलात ही आणला.मात्र आजची वस्तुस्थिती पाहता त्यांच्या या आदेशाला वाहन चालकांसह पोलिसांनी देखील हरताळ फासल्याचे चित्र पहावयास मिळत असून याठिकाणी एकही पोलीस कर्मचारी बंदोबस्तास असल्याचे पहावयास मिळाले नाही.दोन- तीन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी पोलीस बंदोबस्त अपेक्षित होता मात्र तो सकाळ पासून संध्याकाळपर्यंत कुठेही दिसला नाही.त्यामुळे मोठी व अवजड वाहने सर्रासपणे या रस्त्यावरून ये-जा करताना दिसली परिणामी वाहतूक कोंडी प्रचंड होत असून नांदेड सिटी गेट ते नांदेड फाटा हा रस्ता पूर्णपणे गुदमरला आहे.त्यात भर पडली आहे ती सिटी पॉईंट हॉटेलजवळ साचलेल्या पाण्याची.याठिकाणी अगदी गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साठले असून त्याचा निचरा होण्यास अजिबात मार्ग नसल्याने त्याठिकाणी तलावाचे स्वरूप आले आहे.या तलावातून आपली वाहने नेताना दुचाकीस्वारांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. खरं तर हा रस्ता बनवणाऱ्या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान या रस्त्याचे त्वरित काम पूर्ण व्हावे आणि नागरिकांना दिलासा मिळावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतूक वळविण्याचे आदेश काढले, मात्र ते केवळ काही दिवसच अंमलात आणले गेले, त्यानंतर ते केवळ कागदावरच राहिले असून त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली असल्याचे निष्पन्न होत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया चक्क या रस्त्यावर लेखी पोलीस फौजदारी तक्रार दाखल करणारे महेश गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.