पिंपरी: मेरे भाईयो और बहनो म्हणणा-या पांढ-या दाढीवाल्या बाबाने देशातील महिलांचा विश्वासघात केला आहे. सात वर्षांपूर्वी निवडणूक काळात दिवसभर पांढऱ्या दाढीवाल्याची छबी दाखवण्यात येत होती. महिला त्यांच्या आश्वासनाला फसल्या आणि केंद्रात भाजपाचे सरकार आले. हे सरकार शेतकरी आणि महिलांच्या विरोधातच आहे. त्यांना घालविण्याचा निर्धार आता महिलांनी देखिल केला आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. 16 डिसेंबर) पिंपरी येथील सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात संध्या सव्वालाखे बोलत होत्या. यावेळी पिपंरी चिंचवड शहर कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, नवी मुंबई महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा उज्वला सावळे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीस संगिता तिवारी, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, शहर युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेविका निर्मला कदम तसेच प्रा. शैलेजा सांगळे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, नंदाताई तुळसे, छाया देसले, सायली नढे, अनिता अधिकारी, सुप्रिया मलशेट्टी, सुप्रिया पोहरे, स्वाती शिंदे, शोभा पगारे, कमला श्रोत्री, हेमा रमाणी, शितल कोतवाल, मीना गायकवाड, तुलसी नांगरे, शिवानी भाट, प्रतिभा कांबळे, भारती घाग, माऊली मलशेट्टी, सुनिल राऊत, बळीराम काकडे, विजय ओव्हाळ, प्रल्हाद कांबळे, आबा खराडे, किरण नढे, विश्वनाथ जगताप, हरिष डोळस, हिराचंद जाधव, रवी नांगरे, प्रकाश पठारे आदी उपस्थित होते.
संध्या सव्वालाखे म्हणाल्या की, कॉंग्रेसने नेहमीच महिलांचा सन्मान, आदर केला आहे. महिलांना त्यांच्या पायावर उभे करणे म्हणजेच आर्थिक सक्षम केले पाहिजे हे कॉंग्रेसचे धोरण आहे. परंतू केंद्रातील भाजप सरकार विरुध्द काही बोलले तरी ते माझा फोन बंद करतात. भाजप आणि केंद्र सरकार विरुध्द कोणीही बोलले की ते लगेच इडी, आयडीची चौकशी लावतात अशी लोकशाही कोणालाही अभिप्रेत नाही. केंद्र सरकारचे हे वागणे म्हणजे हुकूमशाही आहे अशीही टिका सव्वालाखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. कॉंग्रेस मध्ये गटातटाचे राजकारण नाही. कोणीही कोणाचीही शिफारस घेऊन यायची गरज नाही. जे कॉंग्रेस मध्ये काम करतात, ज्यांच्या मागे नागरीक आहेत, ज्यांचे काम समाधानकारक आहे, त्यांना कॉंग्रेस मध्ये नक्कीच न्याय मिळतो. 16 डिसेंबर हा 1971 ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तान विरुध्द केलेल्या युध्दाचा विजय दिवस आहे. त्याच दिवशी पिंपरी चिंचवड महिला कॉंग्रेसने घेतलेला महिला मेळावा म्हणजेच शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कॉंग्रेसच्या विजयाची नांदी आहे. परिवर्तनाच्या या लढाईत महाराष्ट्रातील महिला कॉंग्रेस डॉ. कैलास कदम यांच्या पाठिशी आहे. आगामी निवडणूकीत पन्नास टक्के जागांवर महिला उमेदवार द्यायच्या आहेत. या निवडणूकीत शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे बहुसंख्य उमेदवार निवडून देण्याचा निर्धार महिलांनी केला आहे असेही संध्या सव्वालाखे यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. कैलास कदम, सुत्रसंचालन नरेंद्र बनसोडे आणि आभार विरेंद्र गायकवाड यांनी मानले.