मुंबई: महात्मा गांधींच्या भूमिकेवर आम्हीही टीका केली. पण स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं योगदान आणि कार्य मोठं आहे. बलाढ्य ब्रिटिश सरकारला आव्हान देण्याचं काम गांधींनी केलं आहे. गांधींचं नेतृत्व धैर्यशील आणि असामान्य आहे. गांधीजींना गोळी झाडण्यात आली. पण गांधी मेले नाहीत. तुम्हाला गोळी झाडायचीच होती तर पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्या मोहम्मद अली जिनांवर गोळी का झाडली नाही. गोडसे खरा हिंदुत्ववादी असता, मर्द असता तर गांधींवर गोळी झाडली नसती, असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. गोडसेने गांधींऐवजी जिनांना गोळी घातली असती तर ती देशभक्ती ठरली असती. गांधींच्या हत्येला एवढी वर्ष उलटली आहेत. पण आजही देश शोकसागरात बुडालेला आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना नथुराम गोडसेच्या कृत्यावर आपली भूमिका व्यक्त केली. कोणी खरा हिंदुत्वावादी असता त्याने जिनांना गोळी घातली असती. त्याने गांधींना गोळी घातली नसती. गांधींना का मारलं असतं? जिनाने पाकिस्तानची मागणी केली होती. त्यांनीच देशाची फाळणी घडवून आणली. ज्यांनी पाकिस्तानची मागणी केली त्यांना गोळी घालायला हवी होती. तुमच्यात हिंमत होती तर जिनांना गोळी घालायला हवी होती. एका फकिराला गोळी मारणं योग्य नव्हतं, असं राऊत म्हणाले.