पुणे: सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे स्वागत करताना चित्रपट्यांच्या गाण्यावर थिरकणारी व मद्यधुंद झालेले तरुण-तरुणी दिसतात. परंतु व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चालेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरीता महाविद्यालयीन तरुणाईने पुढाकार घेतला. दारु सोडा, दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील दूध वाटप केले.
सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे पर्ल यांच्या संयुक्त विद्यमाने दारु सोडा, दूध प्या अभियान राबविण्यात आले. यावेळी नगरसेविका राजश्री नवले, नगरसेवक हरिदास चरवड, माजी नगरसेवक दिलीप नवले, सिंहगड रोड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शिंगाडे, सिंहगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घुले, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर म्हणाले, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण मद्यधुंद होऊन व्यसनाच्या विळख्यात अडकतात. मद्यपान करून भरधाव वेगाने गाडी चालविल्यामुळे अनेक अपघात देखील होतात. नव्यावर्षाच्या सुरूवातीला असे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दारू नको दूध घ्या हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. तरुणांनी नशेच्या आहारी न जाता चांगले संकल्प करून नव्यावर्षाचे स्वागत केले पाहिजे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे, याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशाची युवापिढी निरोगी असेल तर देशाचा अधिक विकास होतो. आपल्या देशाला महासत्ता बनवायचे असेल तर तरुणांनी निरोगी असले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. राजश्री नवले, हरिदास चरवड यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
वर्षा अखेरच्या मधूर संध्येला व्यसनमुक्तीचा संकल्प करण्याकरीता तरुणांसह महिलांनी देखील अभियानात सहभाग घेतला. वडगाव पुलासह न-हे येथील जाधवर इन्स्टिटयूटच्या प्रवेशद्वारात महिलांनी तर ससेवाडी येथील संस्थेच्या प्रांगणात तरुणांनी हे अभियान राबविले.