पुणे: आपल्या अलौकीक आवाजाने संपूर्ण जगाला मोहून टाकणाऱ्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशभरात तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. तसेच या दोन दिवसात देशात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आज संध्याकाळी शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. यावेळी त्यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात येईल. त्यानंतर अंत्यसंस्कारापूर्वी सशस्त्र जवान त्यांना सलामी देतील.
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच आता ब्रीच कँडीतून लतादीदींचे पार्थिव त्यांच्या पेडररोडवरील घरी काही काळ ठेवलं जाणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेेंद्र मोदीही लतादीदींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय दुखवटा काय असतो?
भारतरत्नाने सन्मानित एखाद्या व्यक्तिचं निधन झालं तर ती देशाची मोठी हानी मानल्या जाते. व्यक्तींच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्यास राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो. त्यासाठी तो आधी पूर्णपणे वरपर्यंत फडकावून नंतर अर्ध्यावर आणला जातो. राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊनच सरकार याविषयी निर्णय घेते. यासंदर्भात कठोर आणि ठोस असा कोणताही नियम नाही. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, मनोरंजन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय, अतुलनीय योगदान देत देशाचे नाव मोठं करणाऱ्या व्यक्तींना राजकीय सन्मान देण्यासाठी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येतो. राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात देशातील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येतात. जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या राष्ट्रध्वज फडकाविणाऱ्या पथकाला व कार्यालयाला तत्काळ सूचना देण्यात येतात. या शिवाय देशाच्या बाहेरील भारतीय दूतावासावरील राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवला जातो. या काळात कोणतेही सरकारी किंवा औपचारीक कार्यक्रम केले जात नाहीत.