पुणे: पुणे शहरात बॅनरबाजीवरून एकमेकांना चाणक्ष्य पद्धतीने उत्तर देणे हे राजकीय वर्तुळात आधीपासूनच चालत आहे. सोशल मीडियावर फेसबुक, इंस्टाग्राम तसेच ट्विटर सारख्या साईटवर पोस्ट पडल्यानंतर त्या पोस्ट खाली कमेंट्स पडल्या जातात पण पुण्यात लागलेल्या फ्लेक्स खालीच कमेंट्स सारखे दोन फ्लेक्स लावून ट्रोल करण्याचा प्रकार पुण्यात आढळून आला. हा पुण्यात हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
पुणे महानगरपालिकेची नवीन प्रभाग रचना जाहीर झाल्यावर इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. आपल्या भागात तसेच सोशल मीडियावर नगरसेवकांकडून आपली काम दाखवली जात आहेत. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी ही जाहिरात बाजी केली जाते. विद्यमान नगरसेवक धीरज घाटे यांनी नागरीकांच्या मदतीसाठी 'जिथे गरज तिथे धीरज' अशा आशयाचा बॅनर आपल्या संभाव्य प्रभागामध्ये लावला होता. त्यावर 'धीरज आम्हाला नाही तुझी गरज आता घरी जा परत, नको बापट - नको टिळक पुणेकरांना पाहिजे नवीन ओळख' अश्याप्रकारे सोशल मीडियावर जश्या कमेंट्स टाकल्या जातात तश्या प्रकारच्या दोन छोटे फ्लेक्स लावून त्याला प्रतिउत्तर देण्यात आले आहे.