पुणे: नामवंत नृत्य संस्था डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटीच्या वतीने मध्य प्रदेश येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध कथक कलाकार महामहोपाध्याय पद्मश्री डॉ. पुरू दाधीच (वय ८१) व डॉ. विभा दाधीच यांना विमल भास्कर हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी हा विमल भास्कर पुरस्कार कथक क्वीन सितारा देवी (मुंबई), पदमविभूषण पं. बिरजू महाराज व शाश्वती सेन (दिल्ली), रायगड घराण्याचे मुख्य गुरु पं रामलाल बारेथ व मथुरा देवी बारेथ (छत्तीसगड) या नामवंत कलाकारांना देण्यात आला आहे.
रविवार दिनांक ५ जुन २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता पं. जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे पद्मश्री डॉ. पुरू दाधीच व डॉ. विभा दाधीच यांना विमल - भास्कर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मान पत्र, स्मृतिचिन्ह, शाल, हार, बुके व रूपये पंचवीस हजार रोख असे आहे.
डॉ. पुरू दाधीच यांना पद्मश्री पुरस्कार (२०२०), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१८), भारत सरकार तर्फे टैगोर फेलोशिप, मध्य प्रदेश सरकारचा शिखर सम्मान अशा अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. त्यांनी कथक नृत्यावर अनेक पुस्तके लिहीली आहेत.
संपूर्ण भारतात कथक नृत्याच्या परीक्षा देणारे विद्यार्थी केवळ डॉ. पुरू दाधीच यांची पुस्तके वाचत असतात. या पुरस्कार सोहळ्यानंतर डॉ. पुरू दाधीच नृत्य प्रात्यक्षिक व आपल्या सहकाऱ्यांसह कथक नृत्य प्रदर्शन करणार आहेत. या नृत्य कार्यक्रमात डॉ. विभा दाधीच, हर्षिता दाधीच, पियुष राज आदी कथक कलाकार सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास प्रवेश मूल्य नाही. सर्वांसाठी खुला आहे.