आजवर प्रेम म्हणजे काय? याचा अर्थ सांगणारे अनेक मराठी सिनेमे आपण पाहिले आहेत. परंतु प्रेमाचा एक कायदाही असतो, असे सांगणारा चित्रपट आजवर कधी निर्माण झालेला नाही. मात्र नवोदित मराठी चित्रपट दिग्दर्शक व अभिनेता जे उदय हे प्रेमाचा कायदा हा अनोखा आणि हटके विषय मांडणारा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. 'लॉ ऑफ लव्ह' असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात प्रेक्षकांना प्रेम, प्रेमातला वेडेपणा, ड्रामा आणि ऍक्शनचा थरार पाहायला मिळेल.
'लॉ ऑफ लव्ह' हा मराठी चित्रपट ११ मे २०२३ रोजी पॅन इंडिया लेव्हलवर हिंदी भाषेतून प्रदर्शित होणार आहे. 'लॉ ऑफ लव्ह' म्हणजे प्रेमाचा कायदा. प्रेमाचा एक कायदा आहे. तो काय आहे? व त्याचा चांगला आणि वाईट परिणाम तरुण पिढीवर काय पडतो? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ११ मे रोजी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा लागेल. या सिनेमात फुल्ल टू रोमान्स आणि ऍक्शन अनुभवायला मिळेल.
विशेष म्हणजे, 'केजीएफ' सिनेमातील सुपरस्टार यशला आवाज दिलेला मराठी सुपूत्र सचिन गोळे याच्या जबरदस्त आवाजात 'लॉ ऑफ लव्ह' या चित्रपटाचे हिंदी डबींग झाले आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता जे उदय मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. तसेच या चित्रपटामध्ये शाल्वी शाह, मोहन जोशी, यतीन कार्येकर, अनिल नगरकर, प्राची पालवे आणि योगेश पवार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा ही जे उदय यांची असून तेच या चित्रपटाचे निर्माते देखील आहेत. आणखी एक खास बाब म्हणजे प्रेमाच्या एक वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारी गाणी या सीमेमात आहेत. वेदिका फिल्म क्रियेशन निर्मीत 'लॉ ऑफ लव्ह' सिनेमाला शंकर पवार यांनी संगीत दिले आहे.