पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमी रोकठोक आणि स्पष्टपणे बोलत असतात. त्यांचे रोखठोक बोलण्यामुळे त्यांची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या स्पष्टवक्तपणाची चर्चा राजकारणात आणि राजकारणाबाहेर होत असते.
त्यांच्या याच रोकठोक व स्पष्टवक्तेपणाची पुन्हा एकदा प्रचिती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत पुन्हा एकदा आली. अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. बँक चांगल्या प्रतीचे जेवण देत नाही. जेवण देताना चांगले जेवण द्या. शेतकऱ्यांमुळे बँक आहे, असे स्पष्टपणे अजित पवार यांनी सांगितले. वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर सभासदांना दिल्या जाणाऱ्या जेवणावरून बँक प्रशासन आणि संचालकांना अजित पवार यांनी खडेबोल सुनावले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह बँकेचे सर्व संचालक आणि बँकेच्या संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बँकेचा ताळेबंद मांडण्यात आला. बँकेची एकूण व्यावसायिक उलाढाल 19 हजार 454 कोटी रुपयांची आहे. बँकेला गेल्या वर्षात 352 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झालेला आहे. बँकेचा नफा 70 कोटी 70 लाख रुपये आहे. महाराष्ट्र राज्य बँक असोसिएशनने उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पुरस्कार पुणे जिल्हा बँकेला प्रदान केला आहे. या सभेत अजित पवार यांनी बँकेच्या प्रशासनला फटकारले.