पुणे: प्रतिनिधी - भव्य दिव्य देखाव्यांसाठी प्रसिध्द असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या वतीने यंदा काल्पनिक ‘ॐकार महाल’ हा देखावा साकारण्यात आला आहे. भव्य महलाच्या देखाव्यांची परंपरा असलेले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे ‘बाप्पा’ याच ॐकार महालात विराजमान होणार असल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’च्या वतीने दरवर्षी भव्य महालाच्या प्रतिकृती असलेले देखावे साकारले जातात. यंदाही असाच राजेशाही थाटमाट असलेला ‘ॐकार महाल’ हा काल्पनिक देखावा साकारण्यात आला आहे, या देखाव्याची संकल्पना जान्हवी धारिवाल- बालन यांची असून यावरील नक्षीकाम प्राचीन शैलीतील कापडाची प्रेरणा घेऊन आणि प्रसिध्द अशा ‘कुंदन’ या अलंकाराप्रमाणे साकारण्यात आले आहे. त्यासोबतच या महालाला सुंदर अशा फुलांचा साज चढवण्यात आला आहे. या महालाच्या गाभाऱ्यातील छतावर ‘ॐ गं गणपतये नमो नम: ’ हा मंत्र लिहलेला आहे. त्यामुळे या गाभाऱ्यात होणाऱ्या मंत्रोच्चारामुळे येथील वातावरण कायमच प्रसन्न आणि भक्तीमय राहणार आहे.
पुण्यातील गणेशोत्सवात देखावे हे जगभरातील सर्वच गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण असते. या अनुषंगानेच यंदा हा भव्य-दिव्य असा ‘ॐकार महाल’ साकारला आहे. या देखाव्यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या आनंदात नक्कीच भर पडेल, असा विश्वास आहे.’’
- पुनीत बालन
(उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)
या महालाजवळ उभारलेले झाड पारंपारिक घंटा व आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे. ते मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या प्रेम, आनंद आणि समाधानाचे प्रतीक असेल. महलाच्या गाभाऱ्यातील गणेश घर समृध्द भक्तीचे प्रेरणास्थळ असून, या गाभाऱ्यामध्ये ॐ गं गणपतये नम: मंत्रासह विविध आकर्षक कलाकृती रेखाटण्यात आल्याची माहितीही उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली.