अहमदनगर : चौंडी येथे गेल्या अकरा दिवसांपासून धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले आहे. या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेले आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावली असून त्यांचेवर सरकारी रुग्णालयात उपचार चालू आहेत . उपोषणाला १२ दिवस उलटल्यानंतर मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर चौंडी या ठिकाणी जाऊन आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या व धनगर समाज बांधवांशी संवाद साधला.
या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी गणपती आगमनाच्या दुसऱ्या दिवशी धनगर आरक्षणासंदर्भात बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल असे सांगत उपोषण कर्त्यांना तब्बेतीची काळजी घ्या असे सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी फोनद्वारे बोलणे करून दिले. त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात धनगर समाज प्रतिनिधी, संबंधित अधिकारी व मंत्री यांची दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल तसेच चर्चेतून प्रश्न सुटतात असे सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांचेशी चर्चा केल्यानंतरही जोपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकार आश्वासक व निर्णायक भूमिका घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे यशवंत सेनेचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडतले, उपोषणकर्ते सुरेश बंडगर व प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे यांनी सांगितले.
धनगर समाजाचे गेल्या ११ दिवसांपासून चालू असलेल्या या आमरण उपोषण कर्त्यांच्या मागणी संदर्भात सर कार काय निर्णय घेणार याकडे सर्व धनगर समाज आणि महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.