अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुलभ, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

 


पुणे : "तंत्रज्ञानाचा अंतर्भाव व दिवसेंदिवस होत असलेल्या संशोधनामुळे वैद्यकीय शास्त्र झपाट्याने बदलत आहे. पूर्वीच्या काळात गंभीर आजारांवरील उपचारांसाठी दिल्ली किंवा अन्य शहरांमध्ये जावे लागत असे. आता प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सुलभ व स्वस्त होऊ लागल्या आहेत. युरोकूल हॉस्पिटलमध्ये उभारलेल्या रोबोटिक युरोलॉजी सेंटरमुळे मूत्रविकारांवरील शस्त्रक्रिया करणे अधिक सोयीचे होणार असून, येथील रुग्णांना त्याचा लाभ होईल," असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.


बाणेर येथील युरोकूल-कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये उभारलेल्या पहिल्या रोबोटिक युरोलॉजी सेंटरचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. म्हैसकर फाउंडेशनच्या माध्यमातून दिवंगत दत्तात्रय पी. म्हैसकर यांच्या स्मरणार्थ हे रोबोटिक सेंटर उभारण्यात आले आहे. प्रसंगी सौ. सुधा म्हैसकर, जयंत म्हैसकर, आमदार भीमराव तापकीर, युरोकूलचे संचालक डॉ. संजय कुलकर्णी, डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश देशपांडे आदी उपस्थित होते. अमेरिकेत उत्पादित 'दा विन्सी एक्स' ही रोबोटिक प्रणाली इथे बसविण्यात आली आहे. यावेळी बाणेर-बालेवाडी गावकऱ्यांच्या वतीने श्री व सौ. गणेश कळमकर आणि प्रल्हाद सायकर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती देऊन, तसेच बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सन्मानचिन्ह देऊन गडकरी यांचा सन्मान करण्यात आला.


नितीन गडकरी म्हणाले, "म्हैसकर कुटुंबाने सामाजिक दायित्व जपले आहे. दत्तात्रय म्हैसकर यांच्याशी चांगली मैत्री होती. मूत्रविकारांसारख्या गंभीर आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी ही रोबोटिक यंत्रणा त्यांनी देणगी स्वरूपात युरोकूल रुग्णालयाला दिली, ही चांगली गोष्ट आहे. अनेक गरजू रुग्णांना याचा लाभ होईल. जवळपास दहा कोटींचे हे मशीन असून, लाखो रुग्णांवर उपचार करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून चांगले काम करता येते, हे याचे उत्तम उदाहरण आहे. ९० टक्के सामाजिक कामावर माझा भर असतो. आजवर ४० हजार हृदयाच्या शस्त्रक्रिया, १० हजार लोकांना कृत्रिम पाय दिले आहेत. माझ्या आईच्या स्मरणार्थ रुग्णालय बांधत असून, त्याद्वारे गरिबांना अल्पदरात उपचार मिळणार आहेत."


प्रास्ताविकात डॉ. संजय कुलकर्णी म्हणाले, 'युरोलॉजी' व 'नेफ्फरोलॅाजी'साठी समर्पित १०५ बेडचे 'युरोकुल' भारतातील तिसरे मानांकित हॉस्पिटल आहे. मूत्रमार्गाच्या विकारांवरील अद्ययावत व सुसज्ज सेवा एकाच छताखाली २४ तास उपलब्ध आहेत. रुग्णांवर परवडणाऱ्या किंमतीत शस्त्रक्रिया, तसेच बिल भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून रुग्णाला परत पाठवले जात नाही, हे येथील वैशिष्ट्य आहे. युरोलॉजी प्रशिक्षणासाठी १९८१ मध्ये इंग्लंडला शिकायला गेलो, तेव्हा पैशांची चणचण होती. अनेक अडचणींतून ते शिक्षण पूर्ण केले. तेव्हा एक ठरवले की शिक्षण ही विकायची गोष्ट नाही, तर वाटायची गोष्ट आहे. तेव्हापासून युरोलॉजीमधील शस्त्रक्रिया शिकवण्याचे काम केले.


डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांनी रोबोटिक सेंटरचे स्वरूप, वैशिष्ट्ये व म्हैसकर फाउंडेशनच्या कार्याविषयी माहिती दिली. सुधा म्हैसकर यांनी भावना व्यक्त केल्या. राधिका कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेश देशपांडे यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.