मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आज (३० ऑक्टोबर) त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. तसेच राज्यभरातून लोक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी गावात येत आहेत. उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांची तब्येत अत्यंत बिघडलेली आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी औषध घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी आपल्या फेसबुकवर भावनिक पोस्ट केली आहे.
सुरेश विश्वकर्मा यांनी फेसबुक पोस्ट मध्ये की, मनोज जरांगे पाटलांना पाहून काळजात अत्यंत कालवाकालव होते राव..असा योद्धा शतकांत एखादाच जन्माला येतो..त्यांचंही कुटुंब आहे..आई-वडील, पत्नी, मुलं आणि त्याचबरोबर प्रचंड समाज..या सर्व जणांना त्यांची नितांत गरज आहे..आम्हाला गड ही हवा आहे आणि सिंहही..गड(आरक्षण) मिळताना सिंह आम्हाला सहीशाबुत हवा आहे..मी आत्ता आमचे मित्र, बंधू डॉ.अजितसिंह पाटील यांच्याशी या उपोषणाचे शारीरिक तोटे काय होतील याची चर्चा केली आणि काय तोटे होतील हे ऐकून शहारून गेलो..
मनोजभाऊ..आरक्षण पाहिजे पण ते तुमच्या नेतृत्वाखालीच आणि तुमच्यासमोरच..तुमची हि अवस्था पाहवत नाही..पुन्हा जोमाने उभे रहा आणि डरकाळी फोडा...!!
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळी पहिल्यांदा उपोषण केलं, तेव्हा ते मागे घेत असताना त्यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. तसेच सरकारने दिलेली मुदत पाळली नसल्याने मनोज जरांगे पाटील आता पुन्हा उपोषणाला बसले आहेत. गेल्या ६ दिवसांपासून ते उपोषण करत आहेत. राज्यातील सर्वच भागातून देखिलं जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज उपोषण करत आहे.