पुणे/ प्रतिनिधी - लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे आयोजित दोन दिवसांच्या बालेवाडी शॉपिंग अॅण्ड फूड फेस्टिव्हलची उत्साहात सांगता झाली. यादरम्यान पहिल्या दिवशी बॉईज ४ या मराठी चित्रपटाच्या कलाकारांनी फेस्टिवलला भेट देत सर्वांचाच उत्साह वाढवला. बालेवाडीमधील दसरा चौकातील आठवडे बाजार मैदानावर या शॉपिंग अॅण्ड फूड फेस्टिव्हलचे आयोजन ७ आणि ८ ऑक्टोबर दरम्यान सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत केले होते. या शॉपिंग अॅण्ड फूड फेस्टिव्हलला बाणेर बालेवाडीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
शॉपिंग अॅण्ड फूड फेस्टिवलमध्ये तब्बल ६० हुन अधिक गृहपयोगी तसेच शॉपिंगच्या उत्पादनांचे स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध होते. उत्कृष्ट नियोजन असणाऱ्या या फेस्टिव्हलला बाणेर बालेवाडी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत जोरदार खरेदी केली. या फेस्टिव्हलचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे बॉईज ४ या मराठी चित्रपटाच्या सर्वच कलाकारांनी फेस्टिवलला दिलेली भेट. या वेळी सिनेमाच्या सर्व टीमने बाणेर बालेवाडीकरांसोबत संवाद साधत धमाल केली. या मध्ये पार्थ भालेराव, अभिनय बेर्डे, प्रतीक लाड, रसिक शोत्री, रितूजा शिंदे, जुई बेंडखळे सह दिग्दर्शक विशाल देवरुखकर, आणि निर्माता राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार दीक्षित यांनी केले.
या वेळी 'बॉईज 4' बद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणाले की, "आतापर्यंत 'बॉईज'च्या तिन्ही भागांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या तिन्ही भागांमध्ये काहीतरी सरप्राईस होते. 'बॉईज 4' मध्येही असेच सरप्राईस आहे. प्रेक्षकांचे मिळणारे प्रेम पाहूनच आम्हाला 'बॉईज 4' करण्याची प्रेरणा मिळाली. मला खात्री आहे, हा सिनेमाही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करेल".
शॉपिंग अॅण्ड फूड फेस्टिव्हल आणि लहू बालवडकर सोशल वेल्फेअरबद्दल
या "शॉपिंग अॅण्ड फूड फेस्टिव्हल"च्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वतःचा व्यवसाय सुरु करणाऱ्या महिला आणि व्यावसायिकांना एकत्र करत लहू बालवडकर सोशल वेल्फेअर हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना या शॉपिंग अॅण्ड फूड फेस्टिव्हलचा मोठा उपयोग होत असून त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी देखील मदत होत आहे. स्थानिक पातळीवरील उद्योगाला प्रोत्साहन देऊन त्यांना हातभार लावण्याचे काम लहू बालवडकर सोशल वेल्फेअर करत आहे.