पुणे: लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. बारामतीत महायुतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध महाविकास आघाडीतून खासदार सुप्रिया सुळे अशी लढत पाहायला मिळू शकते. मात्र शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीतून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी अजित पवारांचा सूड घेण्यासाठी हा निर्णय घेणार असल्याचेही म्हटले. दरम्यान आता बारामतीच्या जागेवरून अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ब्लॅकेमल करत असल्याचा गौप्यस्फोटच शिवतारे यांनी केला आहे.
विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. अजित पवार यांनी माझा आवाकाही काढला होता. तुझी लायकी किती? तू बोलतो किती? तुझा आवाका किती? असं अजितदादा बोलले होते. माझा नाही अवाका तर कशाला धडपड करतो? आमच्या मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेलिंग करतो, इकडे उमेदवार उभे करू, तिकडे उभे करू? असा इशारा देतो. कशाला करतो? लढ ना तुझ्या ताकदीवर, असं आव्हान देतानाच माझा पाठिंबा जनतेला आहे. जनता सांगेल ते करणार. महायुतीचा धर्म निभवायचा की नाही याबाबत मी दोन-चार दिवसात माझी भूमिका व्यक्त करणार आहे, असं विजय शिवतारे म्हणाले.
बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या मोठ्या हालचाली सुरू आहेत. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी पवारांविरोधात भूमिका घेतली असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने टीकेची झोड उठवताना दिसत आहे. यामुळे शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या तणाव असल्याचे बोलले जात आहे. प्रसंगी विजय शिवतारे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होऊ शकते, अशी शक्यता असल्याची चर्चा आहे. या घडामोडींमध्ये विजय शिवतारे यांनी एक मोठे विधान केले आहे. विजय शिवतारे यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.