पुणे: मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी मनसे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्याप त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत स्पष्ट सांगितलेले नाही. मात्र मागील काही दिवसांपासून वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत आहेत.आजही ते निवडणूक लढवण्यावर ठाम असून ‘मी एकला चलो रे’च्या भूमिकेवर ठाम आहे, असे विधान वसंत मोरे यांनी केले.
पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विद्यामान आमदार रविंद्र धंगेकर रिंगणात उतरले आहे.तर महायुतीने पुण्याची उमेदवारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर केली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मोरे मंगळवारी रात्री मराठा समाजाच्या बैठकीत पोहचले. यावेळी त्यांनी पुण्यातून खासदार होण्यासाठी मराठा समाजाचे सहकार्य मागितले.
पुण्यात लोकसभेची निवडणूकीसाठी सुरुवातीला महायुतीकडून मुरलीधर मोहोळांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ही लढत एकहाती होण्याची दाट शक्यता होती. मात्र त्यांना आव्हान देणाऱ्या उमेदवाराची महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरु होती. त्यानंतर थेट रवींद्र धंगेकरांचं नाव जाहीर करण्यात आलं. या दरम्यान वसंत मोरे विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहे आणि पुण्यात यंदा वेगळा प्रयोग पाहायाल मिळेल, असं म्हटलं होतं. वसंत मोरे हे नगरसेवक असले तरी पुण्यात त्यांचे नाव सर्वांना परिचित आहे. पुण्याच्या राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा असते. सोशल मीडियावरदेखील ते प्रसिद्ध आहेत. या बैठकीत हजेरी लावल्यामुळे वसंत मोरे मराठा समाजाकडून उमेदवार म्हणून समोर येतात का? आणि मराठे त्यांना पाठिंबा देणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.