लोकसभेच्या निवडणुका खुल्या, मोकळ्या, वातावरणात व्हाव्या ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादी मधून आदर्श आचारसंहितेचा भंग करण्यात आला आहे यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाला पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुका खुल्या, मोकळ्या आणि निकोप वातावरणात व्हाव्यात, ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. कालपासून पक्षांचे स्टार कॅम्पेनर्सची यादी बाहेर येत आहे. आम्ही आयोगाकडे तक्रार केली आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्या पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये दोन चुका केल्या आहेत. शिंदे यांनी आपल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावे दिली आहेत. त्याचप्रमाणे भाजपने त्यांच्या यादीत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं नाव नमूद केले आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
पुढे जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आयोगाच्या नियमानुसार कोणाची नावे अशा स्टार प्रचारकाच्या यादीत टाकू शकता, याची स्पष्टता दिली आहे. मात्र या पक्षांनी अशा पद्धतीने नावं वापरली असतील तर निवडणूक आयोगाला त्यांच्यांवर बंदी घालण्याचा अधिकार आहे. हा प्रकार म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा सर्रास केलेला सर्वात मोठा भंग आहे. तुम्ही दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षाच्या यादीत टाकू शकत नाही असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचारक यादीचा भाग म्हणून इतर राजकीय पक्षांमधील विविध व्यक्तींची नावे प्रसिद्ध केली आहेत, जी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ चे उल्लंघन करणारी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने निदर्शनास आणून दिले आहे. तसेच, शिवसेनेने (एकनाथ शिंदे) पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इत्यादी उच्च सार्वजनिक पदावर असलेल्या विविध लोकांची नावे प्रसिद्ध केली आहेत. हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही. तर, लोकप्रतिनिधी कायदा, परंतु केंद्र किंवा राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे प्रतिनिधी आदर्श आचारसंहिता भंग करत आहेत. निवडणूक प्रचाराच्या उद्देशाने या महत्वाच्या पदांच्या व्यक्तींकडून आपल्या पदांचा गैरवापर होत असल्याचंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.