पुणे लोकसभा मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील लढत नक्की झाल्यानंतर प्रचाराचा वेग हळूहळू वाढी लागला आहे. मुरलीधर मोहोळ यांचे नाव लवकर जाहीर झाल्याने त्यांच्या भेटीगाठी, पक्षाचे मेळावे सुरू झाले आहे. भाजपचा गड मानला जाणारा कोथरूड मतदार संघात नुकताच बूथ प्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना खा. मेधा कुलकर्णी यांनी मोहोळ यांना कोथरूडमधून २ लाख मतांचे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यामुळे नाराज असलेल्या खा. मेधा कुलकर्णी आता मोहोळ यांना कोथरूडमधून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी सरसावल्या आहेत. कोथरूड मतदार संघात ब्राह्मण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच खा. मेधा कुलकर्णी यांना माननारा मोठा वर्ग आहे. खा. मेधा कुलकर्णी यांना डावलल्याची भावना या वर्गात होती. परंतु, खा. कुलकर्णी यांची राज्यसभेवर वर्णी लागल्याने या वर्गात आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर स्वत: खा. मेधा कुलकर्णी सरसावल्या आहेत.
पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोथरूड बूथ प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोथरूडमधील सर्व सक्षम पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांना खा. मेधा कुलकर्णी यांनी मोहोळ यांना कोथरूड मतदार संघातून २ लाखापेक्षा जास्त मताधिक्य देण्याचे लक्ष्य ठेवावे, असे आवाहन केले. त्या म्हणाल्या, २०१४ साली युती नसताना या विधानसभेत नागरिकांनी मला सुमारे ६५ हजार मताधिक्य देऊन आशीर्वाद दिले होते. सरळ सरळ झालेल्या मतदानाच्या ५१ टक्के मतदान भाजपाला मिळाले होते. स्व. गिरीश बापट यांच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कोथरूड मतदार संघातून १ लाख ६ हजार मताधिक्य मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. आत्ताच्या नवीन परिस्थितीत महायुतीमधील पक्ष समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे आता २ लाखाचे लक्ष्य सक्षम पदाधिकाऱ्यांच्या परिश्रमातून नक्की गाठू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.