पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी जाहीर होताच पक्षांतर्गत भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची घरी जावून भेट घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. या भेटींना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून भेटींमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह वाढत असल्याचे चित्र आहे. शिवाय या भेटींदरम्यान मोहोळ यांचा विजय मताधिक्याचा उच्चांक गाठेल, असा विश्वास राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उमेदवाराची घोषणा केल्याने प्रचाराली लागलीच सुरुवात झाली आहे. मोहोळ यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पक्षांतंर्गत भेटीगाठींना प्राधान्य दिल्याने संघटना पातळीवर सर्वच घटक कार्यरत करण्याचा मोहोळ यांचा प्रयत्न आहे. मोहोळ यांनी सर्वात आधी त्यांचे राजकीय गुरु माजी खासदार अनिल शिरोळे यांची भेट घेत संवाद साधला. आपल्याच तालमीतील पैलवान लोकसभेच्या आखाड्यात आल्याने शिरोळे यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. शिवाय शिवाजीनगरचे मा. आमदार विजय काळे यांच्याशीही मोहोळ यांनी संवाद साधला.
कोथरुडच्या माजी आमदार आणि राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्याही घरी मोहोळ यांनी भेट देत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. यावेळी खा. कुलकर्णी यांनी मोहोळ यांचे औक्षण करत विजयाचा संकल्प केला. मोहोळ आणि खा. कुलकर्णी एकत्र आल्याने याचा मोठा फायदा कोथरुड विधानसभेच्या मताधिक्यात होईल, अशी शक्यता राजकीय जाणकारांना आहे. शहर भाजपाचे मा. अध्यक्ष योगेश गोगावले यांचीही भेट मोहोळ यांनी घेऊन त्यांनाही प्रचारात सक्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे.
भेटींबाबत मोहोळ म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टी ही केवळ पार्टीच नाही तर परिवार आहे. त्यामुळे सर्वात आधी परिवारातील घटकांशी संवाद आणि भेटी आवश्यक असतात. शिवाय या निमित्ताने जुन्या आठवणींनाही उजाळा मिळतो. या सर्व भेटींमधून सर्वांचा मिळालेला सकारात्मक प्रतिसाद माझ्या प्रचाराचा उत्साह वाढवणारा आहे. पुढील काळातही या भेटीगाठी कायम सुरु राहणार आहेत.’
मोहोळ यांचा विजय निश्चित असून त्यांचा हा विजय आजवर मिळालेल्या विजयांपेक्षा अधिक मतांचा असेल, असा विश्वास खा. कुलकर्णी यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आता अधिकच्या मताधिक्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. मोहोळ यांच्याशी प्रचाराच्या रणनितीसंदर्भातही बोलणे झाले आहे, असेही खा. कुलकर्णी म्हणाल्या.