पुणे: मूळचे पैलवान असलेले आणि आता भाजपा महायुतीकडून पुणे लोकसभेच्या आखाड्यात उतरलेले पै. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी हजारो मल्ल पुण्यात शड्डू ठोकणार आहेत. आपल्यातीलच एका पैलवानाला थेट लोकसभेसाठी संधी मिळाल्याने विजयासाठी झोकून देऊन काम करण्याचा निर्धार यावेळी पुणे आणि परिसरातील मल्लांनी एकदिलाने करण्यात आला. पै. मोहोळ यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी घर ना घर पिंजून काढू असा निश्चय करत यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे.
पैलवानकीचा सराव करत असताना मोहोळ यांनी कोल्हापूर आणि पुणे परिसरात पैलवानांचा मोठा मित्र परिवार तयार केला होता. आज मोहोळ स्वतः लोकसभेच्या आखाड्यात उतरल्याने पुणे आणि परिसरातील मल्लही मोहोळ यांच्या प्रचारासाठी एकवटले असून पुढील प्रचारासाठी प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यात पुढील ४५ दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. कर्वे रस्त्यावरील अंबर हॅाल येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, विविध तालमींचे वस्ताद, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आवर्जून उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी विकी बनकर म्हणाले, आमच्या पैलवानांपैकी एक पैलवान थेट दिल्लीत जाणार आहे. ही आम्हा सर्वांसाठीच मोठी समाधानाची बाब आहे. म्हणून मोहोळ यांच्या विजयात आपलाही वाटा असावा अशी प्रत्येक पैलवानाची भावना आहे. म्हणूनच आम्ही एकवटलो आहोत. आम्ही एकत्रित येत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन करत असून यात हजारो पैलवान सहभागी होत आहेत. मोहोळ यांचे मताधिक्य वाढवणे ही आता आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही यसस्वीपणे पार पाडू, हा विश्वास आहे’.
हिंद केसरी पै. योगेश दोडके म्हणाले, ‘मोहोळ यांना मिळालेली उमेदवारी ही आम्हा सर्व पैलवानांचा सन्मान आहे. ते लोकसभेत गेल्यावर आम्हा पैलवानांचे प्रश्न पोटतिडकीने मांडतील आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक पाठपुरावा करतील, हा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही सर्वांनी मोहोळ यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे’.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘लाल मातीशी नाते असणारा माझा परिवार एकवटला असून सर्वजण त्यांच्या पातळीवर प्रचारासाठी सज्ज होत आहेत. येत्या कालावधी ८ ते ९ हजार पैलवान स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे माझा सर्व पैलवान परिवार माझ्या उमेदवारीच्या निमित्ताने एकत्र आला आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.