दबंग युवा नेते संदीप वाघेरे, मंगलदास बांदल अन्‌ वसंत मोरे ‘वंचित’ मधून लढणार?

 


लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातून दबंग युवा नेते संदीप वाघेरे आणि मंगलदास बांदल वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तसेच, पुणे लोकसभा मतदार संघातून वसंत मारेसुद्धा वंचितचा पर्याय घेवू शकतात. या तीनही नेत्यांनी गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची तयारी केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या रस्सीखेचमध्ये तिकीटापासून ‘वंचित’ रहावे लागले आहे. त्यामुळे ‘आता माघार नाही’ अशा भूमिकेत या दोन्ही नेत्यांनी दंड थोपाटले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

राज्यातील राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने सुरू असून, वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची भूमिका घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून, ‘वंचित’चे  सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी ७ मतदार संघांमध्ये उमेदवारही घोषित केले आहेत. 


मावळ लोकसभा मतदार संघातून भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी जोरदार तयारी केली होती. पुणे-मुंबई महामार्गासह संपूर्ण मतदार संघात होर्डिंग, बॅनरद्वारे वातावरण निर्मिती केली होती. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून किंवा महाविकास आघाडीकडून त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार, त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणीही केली होती. मात्र, माजी महापौर संजोग वाघेरे यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षेवर अक्षरश: पाणी फिरवले आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीचीही घोषणा केली. त्यामुळे संदीप वाघेरे यांना निवडणुकीतून माघार किंवा ‘वंचित’ च्या तिकीटावर लढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. 

मावळमध्ये वंचितची निर्णायक ताकद… 

वास्तविक, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत माजी नगरसेवक राहुल कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. त्यावेळी कलाटे यांना ४४ हजारहून अधिक मते पडली आहेत. मावळ मतदार संघात गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांना ७५ हजाराहून अधिक मते पडली होती. त्यामुळे वंचितने उमेदवार दिला, तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

शिरुरमध्ये आढळराव पाटील यांना फायदा… 

दुसरीकडे, ‘‘कुणी कितीही अडवले, तरी लोकसभा निवडणूक लढवणारच’’ असा दावा महिन्याभरापूर्वीच पुणे जिल्हा बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी केला होता.  विशेष म्हणजे, विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करण्यात बांदल यांनी योगदान दिले आहे. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे बांदल यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. ही निवडणूक बांदल जिंकण्यापेक्षा डॉ. कोल्हे यांना हरवण्यासाठी लढतील, असे निरीक्षण राजकीय जाणकारांचे आहे. त्यामुळे मंगलदास बांदल निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास त्यांनाही ‘वंचित’ आघाडीकडून उमेदवारी घेण्याचा पर्याय आहे. डॉ. कोल्हे यांना विरोध आणि वंचितच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे  मताधिक्य कमी झाल्यास महायुतीचे उमदेवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना फायदा होवू शकतो. 

पुण्यात वसंत मोरे ‘वंचित’चे संभाव्य उमेदवार… 

पुणे लोकसभा मतदार संघातून मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांनीही निवडणुकीतून माघार घेणार नाही, असा दावा केला आहे. त्यांनी निवडणुकीसाठी बॅक ऑफीसही सज्ज केले आहे. मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर वसंत मोरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उबाठाचे नेते संजय राउत यांची भेट घेतली होती. त्यामुळे मोरे महाविकास आघाडीकडून लढतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, पुण्याची जागा काँग्रेसकडे असल्यामुळे काँग्रेसने या मतदार संघातून कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मोरे यांचा पत्ता कट झाला. परिणामी, वसंत मोरे आता अपक्ष लढण्याऐवजी वंचितमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असा दावा राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.