पुणे: हवामान विभागाने आज अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आज काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसासोबतच राज्यात उष्णतेची लाटही येणार आहे. औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, नाशिक, धुळे, अहमदनगर, बीड आणि जळगाव तसंच नंदुरबार, जालनासह विदर्भातील नागपूर, वर्धा यवतमाळ या भागांमध्ये जोरदार पाऊस बरसणार आहे. होळी नंतर राज्यात तापमानात वाढ होताना दिसत आहे. उन्हाचा पारा प्रचंड वाढत आहे. आता तर सकाळी आणि रात्रीही उष्णता वाढली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानवाढीचा कल कायम आहे. बुधवारी अकोल्यामध्ये देशातील सर्वाधिक 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आता राज्यात काही ठिकाणी पावसाची आणि तीव्र उन्हाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कमी दाबाची रेषा किंवा वाऱ्याची खंडितता उत्तर तमिळनाडू व नैऋत्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागातून कर्नाटक व मराठवाड्यावरून जात असल्याने मराठवाडा व विदर्भामध्ये तुरळ ठिकाणी ढगाळ वातावरणासहित हलक्या पावसाच्या सरी बरसतील. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, लातूर, नागपूर, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटा सहित जोरदार पाऊस पडणार आहे. यासोबतच विदर्भात पुढील 48 तासात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.