मी लढणारा शिवसैनिक आहे. भाजपसोबत इतक्या वर्षाची शिवसेनेची युती होती. याचा अर्थ शिवसेना भाजपात गेली असा होत नाही. काही लोक राजकीय जीवनाशी खेळतात. माझ्याविरोधत सातत्याने खोट्या बातम्या पसरविण्यात येत आहे, मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. हा सगळा प्रकार भाजपकडून करण्यात येत असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी केला. त्यांनी या बातम्यांचे खापर माध्यमांवर पण फोडले. भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेवर त्यांनी माध्यमांशी बोलताना सडेतोड उत्तर दिले. काय म्हणाले दानवे?
मी विरोधी पक्षनेता आहे. लढणारा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाची यादी जाहीर केलेली आहे. तरीही माझ्याविरोधात सातत्यानं खोट्या बातम्या मुद्दामहून पेरल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेंना त्यांनी पूर्णविराम दिला. भाजपत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अगोदर शिंदे गटात जाणार आणि आता भाजपात जाण्याच्या बातम्या बदनामीसाठी पेरल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचं हे काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.