पुणे: बारामती लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धडाक्यात सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसापासून अजित पवार बारामती मतदारसंघात अनेक बैठका, जाहिर सभा घेतांना दिसत आहेत. यातच त्यांची काल सुस मुळशी येथे जाहिर सभा पार पडली. या सभेत त्यांनी ही निवडणुक भावकी, गावकीची नसल्याचे सांगत महायुतीच्या उमेदवारांना निव़डून द्या, असे जाहीर आवाहन अजित पवारांनी यावेळी उपस्थितांना केले.
सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सुस येथील सनीज वर्डमध्ये महायुतीचा तालुका मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले की, ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असेल त्याठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाणाचा प्रचार करायचा आहे. जेथे राष्ट्रवादीचा उमेदवार उभा असेल त्याठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घड्याळाचा प्रचार करायचा आहे. तर ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार असेल त्याठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कमळाचा प्रचार करायचा आहे. असं आवाहन अजित पवार यांनी केलं. त्याच बरोबर यावेळी आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर अतिशय जबाबदारीनं कामाला लागावं आणि समन्वयानं कामं करावीत अशा सूचना देखील त्यांनी केल्या.
बारामतीत राष्ट्रवादीचा उमेदवार आल्यावर केंद्राच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणे शक्य आहे. त्यातुनच बारामतीचा विकास झाला तसाच इतर तालुक्यांचाही केला जाईल. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात शिवसेनेचे पक्ष प्रतोद भरत गोगावले, माजी आमदार शरद ढमाले, अजय भोसले, रंजना कुलकर्णी आदि उपस्थित होते.