बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगलाय. राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर पहिल्यांदा पवार कुटुंबीय लोकसभा निडणुकीला सामोरे जात असून ही निवडणूक प्रतिष्ठापणाला लावणारी ठरलीय. कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी दोन्ही बाजूकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी अजित पवार कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. याचपार्श्वभूमीवर ते सहपरिवार हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणार आहेत.
इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील वाद सर्वांना माहितीये. हर्षवर्धन पाटलांकडून अजित पवारांवर आणि अजित पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर सातत्याने टीका करण्यात आली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मध्यस्थीने दोन्ही नेते राजकीय वाद मिटवून एकत्रित आलेत. आता यामध्ये आणखी एक पाऊल टाकलं जाणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार सहकुटुंब सहपरिवार जाणार हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. अजित पवार १९एप्रिल रोजी संध्याकाळी हर्षवर्धन पाटील यांच्या घरी जाणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापुरातील निवासस्थानी ते स्नेहभोजनाचा कार्यक्रम करणार आहेत. त्याचबरोबर अजित पवार हे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या मनोमिलनातून राजकीय वाद संपणार का? याकडे लक्ष आहे.