धायरी: बारामती लोकसभा मतदारसंघात इतिहासात प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगत आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा पवार कुटुंबातील राजकीय संघर्षही टोकदार होत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातून कुटुंबात कटुता निर्माण होणार का, याबाबत आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुनेत्रा पवार यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई होत असताना मूळ पवार कोण, याबद्दल दावे प्रतिदावे आणि वैयत्तिक टीका टिपण्णी होत आहे. पण या निवडणुकीच्या काळानंतर पवार कुटुंबातील संबंध सुधारू शकतात, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
'चांगलं मताधिक्य मिळणार"
लोकसभा निवडणुकीत आम्हाला चांगलं मताधिक्य मिळेल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे. "आम्हाला नक्कीच चांगले मताधिक्य मिळणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. भोर एमआयडीसी आणि पुरंदर विमानतळाचा प्रश्न महत्वाचा आहे. मी ते काम करणार आहे. गेल्या २५ वर्षांत मी सामाजिक काम करत आहे. काटेवाडीच्या ग्राम स्वछता अभियान आणि निर्मल ग्राम योजना यावर मी काम केले. मला समाजकारणाचा अनुभव आहे," असं सुनेत्रा पवार म्हणाल्या