पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. विदर्भात पाचही लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का कमालीचा घसरला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सावध झाल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात सोसायटी मधील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणयाची जबाबदारी घ्या असा सल्ला महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिला.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खडकवासला येथे महावीर जयंतीच्या मुहूर्तावर अजित पवार यांच्या हस्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले खडकवासला परिसरात मोठमोठ्या सोसायटी, गृहनिर्माण संस्था आहेत यामध्ये पाच पाच हजार लोक राहतात. हा आपल्यासाठी खूप मोठा मतदार वर्ग आहे, आज मी काही सोसायटीमध्ये फिरून आलो त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न हे आपल्या आवाक्यात आहेत, महायुती सरकार नक्कीच या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करेल, रास्ते, पाणी याच प्रामुख्याने त्यांच्या समस्या आहेत.
महाराष्ट्राने जर एखादी जबाबदारी स्वीकारली तर ती निभवण्यात महाराष्ट्र कधीच कमी पडत नाही. आज लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांच्या मागे खासदारांचं पाठबळ उभं करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडू अशी खात्री देखील अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
अनेकदा प्रेमापोटी आपण अनेक गोष्टी करतो पण यामधून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खबरदारी देखील आपण घेतली पाहिजे. मध्यवर्ती निवडणूक कचेरीच्या बाहेर लावण्यात येणारे कटआउट किंवा फलक हे निवडणूक खर्चाच्या मर्यादे बाहेर जाणार नाहीत याची खात्री करा याची आठवण देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना करून दिली.