पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी इंदापुरात अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी आमच्यात गेली ३० वर्षे राजकीय संघर्ष जरूर होता. परंतु आमच्यात व्यक्तिगत संघर्ष नव्हता. आता अजित पवार यांना बरोबर घेऊन राज्याचा विकास करू, अन् इंदापुरमधून भरघोस मताधिक्य देऊ असा शब्द काल हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना दिला.
यावेळी ते म्हणाले की, आपला संघर्ष झाला पण राजकीय होता पण वैयक्तिक नव्हता. सुनेत्रा पवारांना खासदार म्हणून निवडून द्यायचं आहे. पण कार्यकर्त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. दिलेला शब्द पाळण्याचा स्वभाव आमचा आहे, याचा अनुभव तुम्हाला आला असेल. दरवेळी आम्ही तुमचे काम करतो पण परत आमचे काय असा प्रश्न कार्यकर्ते यांच्या मनात होता. स्पष्ट भूमिका असली की अडचणी कमी होतात नसली तर अडचणी वाढतात. सुनेत्रा पवार खासदार असल्या पाहिजेत. असेही ते म्हणाले.
इंदापुरात मेळावा पार पडल्यानंतर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासह सहकुटुंबाने हर्षवर्धन पाटील यांच्या घरी भेट दिला. यावेळी पवार आणि पाटील कुटुंबीयांना स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यामुळे या मनोमिलनातून राजकीय वाद संपणार का? याकडे लक्ष आहे. फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतरही हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यामुळे दोन्ही नेते आता स्नेहभोजनानंतर एकदिलाने काम करणार का याकडे सुद्धा महायुतीसह नेत्यांचे लक्ष आहे. या कौटुंबिक भेटीत, काय चर्चा झाली, याची चर्चा आता तालुक्यात रंगली आहे.