बारामती : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराता आता रंगत येत आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना असलेल्या बारामतीच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. गेल्या दहा वर्षापासून बारामतीच्या खासदारासाठी मीच मतं मागायला यायचो, मात्र गेल्या दहा वर्षात खासदार निधीतून एकही काम बारामतीत झालेलं नाही.सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत बसाल तर विकास काम कशी होणार, तुमच्या लोकसभा मंतदारसंघाल मदत कशी होणार? असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर तोफ डागली.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ इंदापूर तालुक्यात आयोजित मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
सरकारमध्ये सत्तेसाठी नाही तर काम करण्यासाठी आलोय असे सांगत अजित पवार म्हणाले, पाच - सहा वेळा मी उपमुख्यमंत्री पद भूषवले आहे. उपमुख्यमंत्री होण्याचा माझा रेकॉर्ड कोणी तोडेल असं मला वाटत नाही. कारण सहा - सहा वेळेला उपमुख्यमंत्री व्हायला तेवढ्या वेळेला निवडूनही यायला पाहिजे. मी कामासाठी सत्तेत गेलोय, मी सत्तेसाठी हापापलेला माणूस नाही, प्रत्येक कामासाठी निधी द्यायला मी तयार आहे, पाहिजे तेवढा निधी देतो पण लोकसभा निवडणूकीत आमच्यासाठी बटन दाबा, आमच्यासाठी बटन दाबलं तर निधी द्यायला बरं वाटेल अशी पुष्टिही अजित पवार यांनी जोडली.