पुणे: आगामी लोकसभा निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई नाही. तर ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे. देशाचा नेता कोण होईल? हा देश कोणाच्या हाती चालवायला द्यायचा? हे ठरवणारी ही निवडणूक आहे, तेव्हा मत कोणाला द्यायच हे आपण विचार करून ठरवा, असे आवाहन भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना केले.
बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल, आरपीआय (आठवले गट)चे रामदास आठवले, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, पुणे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आदी सह महायुतीच्या घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
बारामतीला कोणीच थांबू शकत नाही. तसंच सुनेत्रा वहिनींना देखील कोणी थांबवू शकत नाही बारामतीमध्ये इतिहास घडेल अन् आपल्या सुनबाई दिल्लीला जातील, असा विश्वास व्यक्त करत फडणवीस म्हणाले, फडणवीस पुढे म्हणाले मागील 25 वर्ष अजित पवार यांनी मेहनत केली, विकास केला, माणसं जोडली. आज बारामतीचे जे रूप आहे ते अजित पवारांमुळेच आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. आगामी लोकसभा निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनीत्र पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई नाही तर लढाई देशाचा नेता निवडण्याची आहे देशाचा नेता कोण होईल? कोणाच्या हाती देश चालवायला द्यायचा? हे ठरवणारी ही निवडणूक आहे.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी केलेली दहा वर्षातील विकास काम आपण पाहिले आहेत. वीस कोटी जनतेला मोदींनी झोपडपट्टीतून पक्या घरामध्ये आणलं, तरुणांसाठी मोठी मदत केली. महिलांना देखील मदत केली. देशात मोठे उद्योग तयार झाले आणि यासाठी मोदी नेहमी प्रयत्नशील असतात. बारा बलुतेदारांचा व्यवसाय वाढवण्यासाठी देखील मोदी यांनी प्रयत्न केले. मागील दहा वर्षे हा फक्त ट्रेलर होता पिक्चर अभी बाकी है, पुढच्या पाच वर्षात बदललेल्या भारत आपण पाहू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.