इंदापूर: राष्ट्रवादी कॉँग्रेस मध्ये फुट पडून अनेक महिने उलटले असले तरी ऐन लोकसभा निवडणुकीत नव्याने या मुद्दयाची चर्चा होताना दिसत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे भाजप सोबत जाण्याच्या तयारीत होते हे वारंवार विविध घटनांचा उल्लेख करून अजित दादा गटातील नेते सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे महाराष्ट्र बघत आहे. आता दादांचे खास असलेले राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर येथे '7 वर्षांपूर्वी गणेश चतुर्थीला काय ठरले होते ते सांगू का? असा सवाल विचारात शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारनिमित्त इंदापूर तालुक्यातील लाकडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले, 'सात वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी झालेल्या बैठकीत मतदारसंघ आणि मंत्री ठरले होते. त्या बैठकीला कोण कोण होते, हे मला माहीत आहे. त्या बैठकीला अजितदादा नव्हते. त्यांना माहितीही नव्हती. मात्र, आता त्याच दादांना खलनायक ठरवले जात आहे,' असा गौप्यस्फोट मुंडे यांनी शनिवारी केला.
या वेळी बोलताना मुंडे असेही म्हणाले की, आमच्या सुनेत्रावहिनी या बारामतीच्या सुनबाई आहेत, त्यांचे माहेर आमच्या मराठवाड्यातील तेर आहे मात्र वहिणींचे आजोबा स्व. बाजीराव पाटील हे मूळचे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या गावचे होते. त्यांना तेर येथे दत्तक दिल्याने ते पुढे मराठवाड्यात स्थायिक झाले. यानुसार सुनेत्रा वहिनी या बारामतीकरांच्या सुनबाई व लेक सुद्धा आहेत. लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक असते, मात्र पराभवाच्या भीतीने काहींनी या निवडणुकीत भाव-भावकी आणली आहे. भावकी वरून भावनिकतेकडे समोरच्यांनी निवडणूक वळवायचा प्रयत्न सुरू केला आहे.
तसेच, 'दादांनी पवारसाहेबांचा शब्दही कधी डावलला नाही. मात्र, आता दादांनाच शत्रू ठरवले जात आहे. २०१९ला पवार साहेबांच्या संमतीने पहाटेचा शपथविधी झाला होता,' असा आरोपही मुंडे यांनी यावेळी केला.