पुणे: एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे सध्या सुनेत्रा पवारांना विजयी करण्यासाठी मोठ मोठ्या बैठका घेतांना दिसत आहेत. अशातच आता नसरापुर येथे सुनेत्रा पवार यांच्यासाठी विजय शिवतारे मोठी सभा घेत असल्याची माहिती त्यांनी दिलीय. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार असल्याचीही माहिती शिवतारे यांनी दिली आहे.
यावेळी शिवतारे म्हणाले की, उद्या संध्याकाळी नसरापुर येथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभा होत आहे. त्याचसंदर्भात भोर वेल्हा आणि मुळशीच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती. जशी ११ तारखेला सासवड सभा झाली होती. तशीच सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत. अशातच आता भोर मतदारसंघात कुलदीप कोंडे आल्याने तेथील वातावरण अगदीच उल्हासित झालं आहे. असेही विजय शिवतारे म्हणाले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, सुनेत्रा पवार यांचं पायगुण चांगला आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपुर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात प्रश्न मांडायला सुरूवात केली आहे. येत्या अधिवेशनात त्या सगळ्याबाबत निर्णय घेतील. असा विश्वास आहे. यातच सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी जाहीर झाली आहे. तर किती बदल झाला आहे. तर विचार करा खासदार झाल्यात तर काय होईल. ? असा विश्वास देखील विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील वाघोलीत सभा घेण्याचं आमचं नियोजन आहे. यातच केंद्रीय मंत्री अमित शाह देखील येत आहे. परंतु वाघोलीत ट्रॅफिकची अडचण आहे. परंतु त्या सभेचं नियोजन आमच्याकडून केलं जाईल. असेही शिवतारे यांनी सांगितले. तर उद्या होणाऱ्या सभेत काही लोकांचे प्रवेश देखील होणार आहेत. तसेच हवेली तालुक्यातल्या सर्व गावांची कशी रचना करायची याविषयी देखील त्या बैठकीत चर्चा झाल्याचे विजय शिवतारे यांनी सांगितले