पुणे : महाराष्ट्रात भाजप प्राणित आघाडीची ताकद वाढली आहे. सुनेत्रा पवारांकडे खूप चांगले आहेत गुण तरी म्हणता बाहेरची आहे सून,अशा शब्दांत रामदास आठवले यांनी शरद पवारांना टोला लगावत सुनेत्राताईंच्या विजयाचा महिना आहे जून आणि अजितदादा फेडतील बारामतीकरांचे ऋण असे म्हणत महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्या नतर आयोजित सभेत आठवले बोलत होते.
पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले, सुप्रिया सुळे यांचं लग्न झालं असून त्या सुळे कुटुंबामध्ये गेलेल्या आहेत, तर सुनेत्रा ताईंचं लग्न होऊन ते पवार कुटुंबात आलेले आहेत त्यामुळे त्यांना बाहेरच कसं म्हणायचं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत 1998 साली 37 – 38 उमेदवार निवडून आल्यानंतर देखील काँग्रेसने त्यांना काढून टाकलं तेव्हा त्यांनी सोनिया गांधी या बाहेरच्या आहेत असं म्हणून काँग्रेस सोबत फारकत घेतली होती. शरद पवार महायुती सोबत आले असते तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली नसती, विकासासाठी शरद पवारांनी मोदी साहेबांसोबत येणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी तो घेतला नाही असं देखील रामदास आठवले यांनी सांगितले.
बारामतीकरांचा विकास लक्षात घेऊन अजित दादांनी महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी त्यांची झाली असे सांगताना आठवले म्हणाले, विरोधक रोज आमच्यावर टीका करतात, शिव्या देतात पण तुम्ही जेवढ्या शिव्या द्याल तेवढा आमचा विजय पक्का आहे आणि आपकी बार चार सो बार होणार आहे. मागच्या वेळेस एनडीएच्या 351 जागा होत्या बीजेपीच्या 303 जागा होत्या या वेळेला बीजेपीच्या 370 जागा येतील असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे तर महाराष्ट्रात 45 जागा निवडून येतील असा आम्हाला विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
निळा झेंडा आहे आमच्या हाती म्हणून मजबूत झालाय झाली आहे महायुती असे सांगत रामदास आठवले म्हणाले, एनडीएच सरकार आल्यानंतर घटना बदलली जाणार, लोकशाहीला धोका आहे असं असा प्रचार होतोय मात्र असं अजिबात होणार नाही.
लोकशाही धोक्यात आलेली नसून इंडिया आघाडी धोक्यात आली आहे. बाबासाहेबांची घटना ही कोणीही बदलू शकत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात लंडन येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या घराचे स्मारक बनवण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी दिला असून आता तेथे स्मारक उभे राहिले आहे. तर मुंबईमध्ये इंदू मिल मधील स्मारकाचं काम अकराशे – बाराशे कोटी रुपये खर्च करून सुरू झाले आहे. असं असताना देखील विरोधक मुद्दाम दलित समाजामध्ये आंबेडकरांचे घटना बदलणार आहे असा गैरसमज पसरवत आहेत असेही आठवले म्हणाले.